ग्रामपंचायत नृसिंहवाडी

ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

गावाची माहिती

"नरसोबाची वाडी" किंवा "नृसिंहवाडी" हे कृष्णा-पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे. दत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांची इथे पूजा केली जाते. ऐन पावसाळ्यामध्ये कृष्णेला पूर येतो, तेव्हा मंदिर पाण्याखाली जाते. पुराच्या पाण्याच्या खुणा त्यानंतरसुद्धा मंदिर परिसरावर दिसत राहतात. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरू असते. दत्तसंप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले. यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना 'मनोहर पादुका' असे नाव आहे. या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृतिमंदिर आहे. नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातले शांत, काहीसे पारंपरिक, प्रसन्न वातावरण मनाला भावते. या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात, त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते. सांप्रत उभे असलेले नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. नसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संथ वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे. नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी, श्री महादबा पाटील महाराज इत्यादींची समाधी मंदिरे आहेत.

लोकसंख्या

एकूण लोकसंख्या: ४१६८ (२०११ जनगणना)

पुरुष: २१४७ | महिला: २०२१

अनुसूचित जाती: २३५

भौगोलिक क्षेत्र

  • एकूण क्षेत्र: ४१८ हेक्टर
  • शेतीखालील क्षेत्र: ३९३ हेक्टर
  • गावठाण क्षेत्र: २५ हेक्टर

शिक्षण

गावातील एकूण १ प्राथमिक शाळा व २ हायस्कूल.

अंगणवाडी केंद्रे: ६

सार्वजनिक सुविधा

  • नळ पाणी पुरवठा योजना
  • २ बोअरवेल (विद्युत पंप)
  • गोबर गॅस एकूण संख्या २८
  • औषध दुकाने: ४
  • खाजगी दवाखाने: ८

ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: ८

  • सरपंच: श्री. चेतन चंद्रकांत गवळी
  • ग्रामपंचायत अधिकारी: श्री हेमंतकुमार रघुनाथ कोळी

संपर्क

📞 सरपंच: 9420007261

📞 ग्रामपंचायत अधिकारी: 8207781418